काल मित्राकडे जाण्याचा योग आला. गप्पा सुरु असताना असं लक्षात आलं की, मित्र आणि त्याच्या बायकोचा दिवाळी सुट्टीत ट्रिपला जाण्याचा प्लान चालला आहे. मित्राने सांगितलं की सुट्टीत बायकोला कुठेतरी दूर फिरायला जायचं आहे आणि मित्राला सुट्टी कमी असल्याने दोन दिवस गावी आई-वडिलांकडे जाण्याचा त्याचा बेत आहे. म्हणजेच काय तर सुट्टया जवळ आल्या की ट्रीपचा प्लान सुरु होतो आणि घरातील इतर सदस्यांच्या आवडी-निवडी-सवडी नुसार, फिरायला कोठे, कधी आणि कसं जायचं यांच्या बैठकी सुरु होतात.

ट्रिपचा प्लान करताना सुरुवात होते ती स्थळ निवडीपासून. मित्र-मैत्रिणींनी सोशल-मेडिया मध्ये टाकलेले फोटोज, सरकारी यंत्रणा, पर्यटन संस्था यांनी दाखवलेल्या पर्यटनाच्या जाहिराती, Youtube वरील प्रवास आणि भटकंतीचे videos अश्या अनेक माध्यमातून स्थळ निवडीचा विधी पार पडतो. त्याप्रमाणे आपण सुट्टीत आपल्या आवडत्या ठरलेल्या ठिकाणी सहकुटुंब किंवा मित्र-मैत्रिणींसोबत जाऊन मौज-मजा करून येतो आणि फ्रेश, तजेल मनाने पुढील नेहमीची-रोजची कामे सुरु होतात. या प्रवासामध्ये किंवा ट्रीप मध्ये आपल्याला फिरायला घेऊन जाणाऱ्या त्या tourism कंपनी शिवाय आपला संबध पर्यटनाशी कुठे व कसा येतो, हे आपल्याला पुरेसं माहित नसतं. प्रवास व पर्यटन (Travel and Tourism) हे शब्द नेहमीच आपल्यासमोर येत असतात, परंतु त्याबद्दलची स्पष्टता आपल्याला नसल्याने आपणही त्याचा भाग असतो हे आपल्याला माहित नसते. त्यामुळे आज आपण प्रवास व पर्यटन याबद्दल थोडी माहिती करून घेऊ.

प्रवास म्हणजे काय?

प्रवास म्हणजे एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत स्थलांतर करणे किंवा जाणे. इतकी साधी-सरळ प्रवासाची व्याख्या होईल. तर मग पर्यटन म्हणजे नक्की काय? परंतु पर्यटनाची व्याख्या थोडी विस्तृत (broader) आहे.

पर्यटनाची व्याख्या?

जागतिक पर्यटन संस्थांच्या व्याख्येप्रमाणे – ‘चोवीस तासापेक्षा अधिक व एक वर्षापेक्षा कमी काळ, घर व कामाची जागा सोडून इतर जागी राहणे, तेथील दृश्ये पाहणे आणि आनंद लुटणे म्हणजे पर्यटन’. अशी औपचारिक (formal) व्याख्या करायला गेल्यास ती अधिकच क्लिष्ट होत जाईल म्हणून मी आपल्या सोप्या मराठी भाषेत सांगायचा प्रयत्न करेन.

पर्यटन म्हणजे काय?

“एकटे किंवा समूहाने, घर आणि कामाच्या जागे व्यतिरिक्त दूर राहून तेथील गोष्टींचा आनंद घेणे व वापर करणे, तेथंपर्यंत प्रवास करणे, तेथील खाणं-पिणं-राहणं, मनोरंजन, खरेदी, तेथील स्थानिकांशी संवाद-भेटीगाठी घेणं, तसेच यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व घटना, आपण केलेलं नियोजन व आपली योजना, संपर्कात येणाऱ्या संस्था व उद्योग, या सर्वांच्या एकूण सहभाग व समावेशातून आपल्याला मिळणारा अनुभव (experience) किंवा अनुभवांची शृंखला म्हणजे पर्यटन.“

पर्यटनाची नक्की सुरुवात कोठून होते आणि कुठे संपते हे सांगणे तसे अवगड आहे. परंतु सर्वसाधारणपणे, आपल्या मनात एखाद्या जागेविषयी/दृश्याविषयी आवड निर्माण होते, तेथूनच खरी पर्यटनाची सुरुवात होते आणि तेथे जाऊन तो अनुभव घेऊन येईपर्यंत पर्यटन सुरूच असते. फेसबुकवर मित्र किंवा मैत्रिणीने टाकलेला एखादा फोटो असेल, चित्रपटातील एखादे दृश्य असेल किंवा वर्तमानपत्रातील एखादे लेखन असेल, ते पाहून-वाचून आपल्यालाही त्या जागी जाऊन येण्याची, ते सौंदर्य दृश्य प्रत्यक्ष पाहण्याची सुप्त इच्छा मनामध्ये जागृत होते. ती इच्छाच पर्यटनाची सुरुवात असते. त्या इच्छेने आपण त्याबद्दल अधिक माहिती गोळा करायला सुरुवात करतो. मग तिथे पोहोचण्यासाठी बजेट व सोयीचा रस्ता व वाहतूक यांची निवड करतो. तेथे राहण्याची सोय करतो. आपण प्रत्यक्ष तेथे जाऊन त्या गोष्टीचा अनुभव घेऊन येतो आणि तो अनुभव मित्र-मैत्रिणींशी प्रत्यक्षात किंवा सोशल मेडिया मध्ये शेअर करतो. ते पाहून इतरांच्या मनामध्ये सुद्धा तो अनुभव घेण्याची इच्छा जागृत होते.

एकंदरीत प्रवास व पर्यटनासाठी एखादी प्रेरणा(motivation), हेतू, उद्देश किंवा निश्चय असणे गरजेचे आहे. कृषी पर्यटन आणि शाश्वत पर्यटन यासारख्या पर्यटनामागे ही जसा वेगळा उद्देश असतो त्याप्रमाणे प्रत्येक पर्यटनामागे वेगवेगळे हेतू असतो. या प्रेरणा किंवा उद्देशानुसार पर्यटनाचे अनेक वेगवेगळे प्रकार पडतात. सण-समारंभासाठी गावी जाणे असो किंवा कार्यासाठी/दर्शनासाठी एखाद्या धार्मिक ठिकाणी जाणे असो, कामानिमित्त बाहेरगावी-परदेशी जाणे असो किंवा दवाखान्यासाठी घरापासून दूर जाणे असो, हे सर्व पर्यटनाचाच भाग आहेत. फक्त आरामासाठी, मौजमजेसाठी किंवा आनंदासाठी फिरायला जाणे म्हणजे पर्यटन नव्हे. 

तर पुढील भागांमध्ये हे पर्यटनाचे प्रकार कोण-कोणते आहेत हे पाहूयात.

Mahesh Tile

मी महेश टिळे, विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी कर्मधर्मसंयोगाने कला-अध्यापक आहे. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये कलाशिक्षक (Art Teacher), Animator, Programmer, Web-Developer इत्यादी क्षेत्राचा अनुभव घेऊन, आता तंत्रज्ञानासोबत पर्यटन आणि भारतीय संस्कृती या विषयामध्ये मी अभ्यास करीत आहे. अधिक वाचा

One thought on “पर्यटन म्हणजे काय?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.