पॅलेस ऑन व्हील्स च्या यशानंतर देशाच्या मध्य व पश्चिम भागात आणखी एका भारतीय विलासी रेल्वेचा प्रवास सुरु झाला तो म्हणजे डेक्कन ओडिसीचा. डेक्कन ओडिसी (Deccan Odyssey) ही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसीच्या) कल्पनेतून सुरु झालेली भारतीय विलासी रेल्वे आहे. महाराष्ट्रात विलासी रेल्वे दौरा सुरू करण्याचा पहिला प्रस्ताव २००१ साली तयार करण्यात आला होता आणि त्यानुसार एमटीडीसी आणि भारतीय रेल्वे मंत्रालयाने त्याच वर्षी हा प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी सामंजस्य करारही केला.

डेक्कन ओडिसीवर काम सुरू करण्यासाठी २००२ मध्ये रेल्वे बोर्डाकडून इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) या संस्थेला परवानगी मिळाली. ICF च्या डिझायनर्सना या विलासी रेल्वेच्या डिझाइनला साधारण वर्षभर गेले. 2003 च्या उत्तरार्धात ही निळी राजेशाही आणि विलासी रेल्वे पूर्ण झाली, आणि ती प्रत्येकाच्या पसंतीसही उतरली. ही डेक्कन ओडिसी, दक्षिण आफ्रिकेची ब्लू ट्रेन किंवा युरोपची ओरिएंट एक्स्प्रेस यांसारख्या जगातील सर्वोत्तम रॉयल रेल्वेच्या यादीत समाविष्ट झाली. ही रेल्वे प्रत्येक आधुनिक सुविधांनी युक्त आहे, जी महाराष्ट्रातील लक्झरी ट्रेनची सहल आरामदायी आणि डीलक्स बनवण्यात योगदान देते.

16 जानेवारी 2004 च्या पहाटे, छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई येथून डेक्कन ओडिसी इंडियनच्या या राजेशाही प्रवासाला सुरुवात झाली आणि महाराष्ट्राच्या पर्यटन उद्योगाला एक नवे वळण मिळाले. जगप्रसिद्ध ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सनेही डेक्कन ओडिसीशी हातमिळवणी करून पाहुण्यांना पंचतारांकित हॉटेल सुविधा उपलब्ध करून दिली. एकूण 21 कोच असलेली ही विलासी रेल्वे अतिशय मोहक आणि पूर्वीच्या काळातील महाराजांच्या शाही सजावटीने सजून महाराष्ट्रभर फिरू लागली. एक आठवडाभर चालणाऱ्या डेक्कन दौऱ्यात समाविष्ट असलेली सर्व स्थळे उत्तम प्रकारे निवडण्यात आली आहेत, जेणेकरून पर्यटकांना विविध निसर्गदृश्यांमधून मार्गक्रमण करण्यासोबतच महाराष्ट्राच्या विविधतेचे दर्शन देता येईल. 

ही डेक्कन ओडिसी (Deccan Odyssey), निळी निमोझीन म्हणून प्रसिद्ध आहे. जी अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे. हीचे मुंबई आणि नवी दिल्ली येथून निर्गमन होते व ती महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यातून सहा वेगवेगळ्या मार्गावरून परिक्रमा करते. हा प्रवास एकूण ८ दिवस व  ७ रात्रीचा असतो, त्या मार्गांची यादी खालीलप्रमाणे… 

 1.  महाराष्ट्र स्प्लेंडर (Maharashtra Splendor) 
  • मुंबई – नासिक – वेरूळ लेणी – अजंठा लेणी – कोल्हापूर – गोवा -रत्नागिरी – मुंबई 
 2. महाराष्ट्र वाईल्ड ट्रेल (Maharashtra Wild Trail)
  • मुंबई – वेरूळ लेणी – औरंगाबाद – रामटेक – ताडोबा – अजंठा लेणी – नासिक – मुंबई 
 3. ज्वेल्स ऑफ द डेक्कन (Jewels Of The Deccan)
  • मुंबई – विजापूर – ऐहोळे आणि पट्टडकल – हंपी -हैद्राबाद – वेरूळ लेणी – अजंठा लेणी – मुंबई 
 4. हिडन ट्रेजर्स ऑफ गुजरात (Hidden Treasures Of Gujarat)
  • मुंबई – बडोदा – पालीताना – सासन गीर,सोमनाथ, कच्छचे छोटे रण, मोढेरा – पाटण – नासिक – मुंबई 
 5. इंडियन सोजर्न (Indian Sojourn)
  • मुंबई – बडोदा – उदयपूर – जोधपूर – आग्रा – सवाई माधवपूर – जयपूर – नवी दिल्ली 
 6. इंडियन ओडिसी (Indian Odyssey)
  • दिल्ली  – सवाई माधवपूर – आग्रा – जयपूर – उदयपूर – बडोदा – वेरूळ लेणी, औरंगाबाद – मुंबई 

अशी ही महाराष्ट्राची शान असलेली निळीशार विलासी रेल्वे ‘डेक्कन ओडिसी’, अनेक पर्यटकांना डेक्कनच दर्शन करून देत आहे.

Mahesh Tile

मी महेश टिळे, विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी कर्मधर्मसंयोगाने कला-अध्यापक आहे. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये कलाशिक्षक (Art Teacher), Animator, Programmer, Web-Developer इत्यादी क्षेत्राचा अनुभव घेऊन, आता तंत्रज्ञानासोबत पर्यटन आणि भारतीय संस्कृती या विषयामध्ये मी अभ्यास करीत आहे. अधिक वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.