प्रवास हा पर्यटनाचा एक अविभाज्य घटक आहे आणि रेल्वे प्रवासाचा अनुभव घेतल्याशिवाय अनेक देशी व परदेशी पर्यटक भारतातील प्रवास करण्याचा विचार करू शकत नाही. भारतीय रेल्वे देशाच्या प्रमुख भागांना एकमेकांशी जोडते आणि प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग उपलब्ध करून देते. पर्यटनाच्या विकासात आणि प्रचारात रेल्वे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. भारतीय रेल्वे विभागाला याची जाणीव असल्याने गेल्या काही दशकामध्ये रेल्वे अधिकारी पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण पॅकेजेससह पुढे येत आहेत. त्यापैकीच पॅलेस ऑन व्हील्स ही पर्यटनाला खास प्रोत्साहन देणारी अशीच एक योजना आहे. पॅलेस ऑन व्हील्स हा भारतीय रेल्वेचा राजस्थान पर्यटन विकास महामंडळासोबतचा एक संयुक्त उपक्रम आहे. हा उपक्रम सुरु करण्यामागील हेतूचा थोडक्यात आढावा घेऊयात. 

Palace On Wheels

1980 च्या अखेरीस, बीबीसीने त्यांच्या नेटवर्कवर ‘ग्रेट रेल्वे जर्नीज ऑफ द वर्ल्ड’ नावाची मालिका चालवली होती. त्याच्या मालिकेच्या मीडिया कव्हरेज मध्ये असे दिसून आले की, या मालिकेत भारतीय रेल्वेच्या भागास खूप चांगला प्रतिसाद जगभर मिळाला. मीडिया रिपोर्ट्सचा सार असा होता की भारतीय रेल्वेचे वेगवगळे आकार, विविध गेज, विविध प्रकारचे रेल्वे मार्ग, त्यातील प्रवास ही वैशिष्ट्ये विशेष परदेशी लोकांना आकर्षित करीत आहेत. त्यामुळे भारताला भेट देणाऱ्या अनेक परदेशी पर्यटकांना असे वाटत होते की, किमान एकदा तरी थोड्या वेळेकरिता का होईना आपण भारतीय रेल्वेचा आनंद अनुभवलाच पाहिजे. त्यांच्यापैकी बरेच जण नामशेष होत चाललेली, लहान वाफेवर चालणारी इंजिने असलेली, वेडीवाकडी वळणे घेत डोंगरातून जाणाऱ्या रेल्वेचं मोहक दृश्य अधिकच प्रेमात पाडत होतं. 

भारतातील रेल्वे मंत्रालयाने या गोष्टीची विशेष दखल घेतली आणि परदेशी पर्यटकांना, त्यात खास करून युनायटेड किंग्डम (यूके) मधील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट पर्यटन प्रकल्प सुरू करण्याचा विचार केला. हेतू हा होता की, परदेशी पर्यटन बाजारपेठेत भारतीय रेल्वेचे असलेले प्रचंड आकर्षण व त्यावर आधारित विशिष्ट योजना तयार केल्या जाऊ शकतात. यामुळे देशासाठी मौल्यवान परकीय चलन कमावण्याचा उद्देश पूर्ण होईल व आंतरदेशीय पर्यटन बाजारपेठेतही भारताचा हिस्सा वाढेल.

Palace On Wheels

जानेवारी 1981 मध्ये होणाऱ्या वाणिज्य मंत्रालय-भारत सरकार आणि व्यापार मंत्री – यूके सरकार यांच्या मध्ये होणाऱ्या चर्चेमध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाने वाणिज्य मंत्रालयाला प्रायोगिक प्रकल्पाची रूपरेषा देणारी एक टिपण पाठवले होते. या चर्चेदरम्यान रेल्वेच्या या प्रकल्पावर ठोस काहीही समोर आले नसले तरी हा विचार पुढे चालू ठेवण्यावर एकमत झाले. मे 1981 मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री तथा चेअरमन यांनी यूकेला भेट दिली आणि ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालय, एअर इंडिया, इंडिया टुरिस्ट ऑफिस, कॉमनवेल्थ सचिवालयाच्या एक्सपोर्ट मार्केट डेव्हलपमेंट विभागाचे संचालक आणि यूकेमधील आघाडीच्या ट्रॅव्हल एजंट्स इत्यादींशी लंडन येथे चर्चा केली. भारतीय रेल्वे ज्या धर्तीवर पॅकेज टूरचा विचार करत आहे, त्याला यूकेच्या पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल यावर बैठकीत सर्वसाधारण एकमत झाले.

बाजारपेठेतील अनेक वर्गाकडून अनुकूल प्रतिसाद मिळाल्याने, भारत सरकारच्या पर्यटन विभागाशी सल्लामसलत करून रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पाला ठोस स्वरूप देण्यास सुरुवात केली. या प्रकल्पाच्या संकल्पनेची व्याख्या करण्यात आली होती- हॉटेल ऑन व्हील जे रात्री फिरते आणि दिवसा पर्यटन केंद्रावर स्थिर केले जाते, जेणेकरून पर्यटक पर्यटन स्थळी फिरू शकतील. अशा प्रकारे, प्रवास आणि राहण्याची क्रिया एकत्र केली जाऊ शकते. त्यामुळे भारतातील महत्त्वाच्या पर्यटन केंद्रांना जोडणारी पॅकेजेसची मालिका सुरू करता येईल, असा विचार करण्यात आला. या पॅकेजेसच्या मालिकेतील सर्वात पुढे आले आणि जे अल्पावधीत कार्यान्वित होऊ शकले त्याचे नंतर पॅलेस ऑन व्हील्स असे नाव देण्यात आले. 

राजस्थान हे किल्ले, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि असंख्य निसर्गरम्य स्थळांनी नटलेले असल्यामुळे राजस्थानमध्ये पर्यटनाची अफाट क्षमता असल्याचे दिसून आले. त्यामुळे संकल्पनेच्या धर्तीवर एक पॅकेज राजस्थानमध्ये सुरु केले जाऊ शकते. राजस्थानमध्ये प्रामुख्याने मीटर गेज ट्रॅकचे जाळे (भरतपूर – सवाई माधोपूर – कोटा विभाग वगळता दिल्ली-बॉम्बे ट्रंक मार्गावर) असल्याने, राजस्थानमधील विशेष पर्यटक रेल्वे ही मीटर-गेज ट्रेन असावी. त्यानुसार विशेष रेल्वेचे डबे हवे होते. एक कल्पना उदयास आली ती म्हणजे पूर्वीच्या महाराजा आणि व्हाईसरॉय यांच्या मालकीच्या जुन्या डब्यांचे नूतनीकरण आणि विलासदायी रेल्वेमध्ये कॅरेज म्हणून काम करता येईल. जुने जगाचे आकर्षण पूर्ण करण्यासाठी रेल्वेला वाफेच्या इंजिनद्वारे नेले जाऊ शकते आणि पर्यटकांना भूतकाळातील भारताच्या वैभवाचे दर्शन व अनुभव देता येईल. याने व्यवसायिक संधी निर्माण होईल व चांगला आर्थिक फायदाही होईल. तसेच सध्या वापरात असलेले रेल्वेगाड्या ताफ्यातून बाहेर काढण्याची आणि पर्यटक ट्रेनचे डबे म्हणून काम करण्यासाठी पुनर्निर्मित आणि नूतनीकरण करण्याची आवश्यकता ही नाही. कारण हा प्रकल्प जर काम करू शकला नसता तर मोठा खर्च भारतीय रेल्वेला झाला असता. याच विलासी रेल्वेच्या पहिल्या पॅकेजला पॅलेस ऑन व्हील्स (POW) असे नाव देण्यात आले. पॅलेस ऑन व्हील्स सुरु करण्याचा निर्णय जून 1981 मध्ये घेण्यात आला.

Palace On Wheels

राजा-महाराजांच्या मालकीच्या, राजपुताना आणि गुजरातच्या संस्थानांच्या पन्नास वर्षाहून अधिक जुन्या शाही गाड्या या पॅलेस ऑन व्हील्स साठी निवडल्या. इंटीरियर डिझायनर व तज्ञांच्या मदतीने त्यांचे मजबुतीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले. अजमेर येथील रेल्वे कोच वर्क्स येथे हे काम पूर्णत्वास आले. मुख्य म्हणजे इथे हे सुनिश्चित केले गेले की यात या जुन्या शाही वारशाचे मूळ वातावरण तसेच राहिले पाहिजे व शक्य तितके थोडे बदलले गेले. आणि अशा तऱ्हेने पॅलेस ऑन व्हील्स या विलासी रेल्वेची सुरुवात झाली.

फोटो क्रेडिट: CC0 – Photos_Worldwide

Mahesh Tile

मी महेश टिळे, विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी कर्मधर्मसंयोगाने कला-अध्यापक आहे. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये कलाशिक्षक (Art Teacher), Animator, Programmer, Web-Developer इत्यादी क्षेत्राचा अनुभव घेऊन, आता तंत्रज्ञानासोबत पर्यटन आणि भारतीय संस्कृती या विषयामध्ये मी अभ्यास करीत आहे. अधिक वाचा

One thought on “पॅलेस ऑन व्हील्स – भारतीय विलासी रेल्वे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.