स्वातंत्रोत्तर काळातील वाढत्या औद्योगिकरणामुळे ग्रामीण भागातील लोकांनी शिक्षण, नोकरी, व्यवसाय-रोजगारासाठी शहरी भागाकडे धाव घेतली. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील अनेक शहरांचा जागतिक स्तरावर विकास झाला, परंतु मूळ शेतीपासून अनेक लोक दूर गेले. नव्या पिढीला सर्व शहरी गोष्टींचा उपभोग घेतल्यानंतर मात्र वडिलोपार्जित शेती खुणावू लागली आणि विसाव्या शतकाच्या अखेरीस कृषी पर्यटनाने जोर धरला. बॅक टू द रूट्स म्हणत, शेती म्हणजे काय, ती कशी असते, शेतकरी कसा काम करतो यासारख्या गोष्टींनी, शहरी पर्यटकांना आकर्षित करायला सुरुवात केली.

कृषी पर्यटन - Agri Tourism

कृषी पर्यटन –

शेती, ग्रामीण जीवन आणि पर्यटन यांचा समन्वय म्हणजे कृषी पर्यटन. शाश्वत पर्यटनात अग्रस्थानी आणि पर्यटन रोजगार वाढीस बळकटी देणारा एक पर्यटन प्रकार. १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने कृषी पर्यटनाचा, एक पर्यटक, अभ्यासक, शेतकरी आणि सरकारी योजना यांच्या नजरेतून आढावा घेण्याचा एक प्रयत्न.

राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थिती, गारपीटं, वादळं, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे, शेती व शेतकी रोजगारांमध्ये घट होताना दिसून येत आहे. गतवर्षातील शेती व्यवसायातील झालेली घट (महादेश रिपोर्ट १७-१८) बघता येत्या काळात कृषी पर्यटन हा शेतकऱ्यासाठी पर्यायी उत्पन्न मिळवून देणारा मार्ग ठरेल. परिणामी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) गांभिर्याने विचार करून २०१६ च्या पर्यटन धोरणामध्ये कृषी पर्यटनाचा विचार केलेला दिसतो आहे.

कृषी पर्यटन - Agri Tourism

कृषी पर्यटनाची आवश्यकता आणि फायदे –

आज शेतीच्या पुनरुज्जीवनासाठी व वाढीसाठी, कृषी व ग्रामीण पर्यटनाची गरज आहे. या कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांसाठी स्थानिक बाजारपेठ व इतर रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तसेच शेतीसोबत जोडधंदा आणि त्यातून पर्यायी व अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्यास होईल. ग्रामीण व स्थानिक रोजगारामध्ये वृद्धी होऊन, बेरोजगार, कुशल व अकुशल श्रमिकांना स्थानिक परीसरामध्येच काम व मोबदला मिळेल. गावातील सोयी-सुविधांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होईल. शेतकरी व गावाच्या सर्वांगीण विकासासोबत लोकांचा अभिमान वाढेल आणि स्थनिक वारसा, इतिहास, चालीरिती इत्यादीबद्दल सर्वांना माहिती होईल. शिवाय लघुउद्योग-कुटिरोद्योगास चांगली दीर्घकाळ चालना मिळेल.

पर्यटकांसाठी शेती व शेतीविषयक कार्याचे आकलन होण्यासाठी व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी कृषी पर्यटन हा उत्तम पर्याय आहे. पुस्तकांत किंवा चित्रपट व सोशल मीडियामध्ये दिसणाऱ्या शेतीतील गोष्टींना स्वानुभवाने आत्मसात करता येईल. लहान मुलांना झाडावर चढणं, आंबे व फळे  काढणं, म्हैशीच्या पाठीवर बसून फेरफटका मारणं, शेतातील भाजी काढणं, पक्षी-प्राणी निरीक्षण करणं, पाटातील पाण्यात किंवा पाळीव प्राण्यांसोबत मनसोक्त खेळणं यासारख्या गोष्टींचा अनुभव ही घेता येईल. शिवाय मोठ्यांना चुलीवरचे जेवण, ताजी भाजी-फुले-फळे, शुद्ध हवा, मानसिक शांतीसाठी आवश्यक अशी शांतता, झाडाखाली सावलीतील किंवा मचाणावर झोप, विहारीतील अंघोळ अश्या ग्रामीण जीवनशैलीचा उपभोग घेता येईल.

2009 मध्ये आलेल्या फार्म-विले नावाचा एक गेम सोशल मिडिया मध्ये चांगलाच गाजला होता. त्यामध्ये गेम खेळणारी व्यक्ती बियाणे घेण्यापासून, शेतीची सर्व कामे करून ते बाजारपेठे मध्ये विक्री करण्यापर्यंतची सर्व कामे ही आभासीपणे (virtual) करू शकत होती. अश्या आभासी खेळांपेक्षा प्रत्यक्ष शेतात जाऊन त्या गोष्टी करण्यामध्ये अधिक आनंद मिळेल.

सरकारी यंत्रणेपुढे ग्रामविकास हे एक प्रमुख उद्दिष्ट असते, कारण आजही भारतात ७० ते ८०% लोक हे शेती करतात.  पर्यटकांनी कृषी पर्यटनास साथ दिली तर सरकारी योजनेमधून गावाचा-परिसराचा, रस्ते-पाणीपुरवठा यासारख्या विकासावर भर देऊन एकूण गाव, राज्य व देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी प्राधान्य दिले जाईल.

कृषी पर्यटन - Agri Tourism

कृषी पर्यटनात घ्यावयाची काळजी –

कृषी पर्यटन करताना पर्यटकांनी खास काळजी घेणे आवश्यक आहे, कारण शहरी व ग्रामीण जीवन यामधील कार्यप्रणाली मध्ये खूप मोठा फरक असतो. तो फरक लक्षात घेऊन, आपल्याला इजा-दुखापत होणार नाही याची काळजी घेऊनच पर्यटनातील उपक्रमामध्ये पर्यटकांनी समाविष्ट व्हावे. शेतकऱ्याच्या अथवा तेथील ज्ञात व्यक्तीच्या देखरेखीखालीच सर्व गोष्टींचा आनंद घ्यावा. झाडावर चढ उतार करताना काळजी घ्यावी, तसेच शक्ती वापराची कामे प्रमाणात करावीत. झाडे, प्राणी, पक्षी, शेतकी अवजारे, शेतकरी, त्याचे कुटुंबीय व स्थानिक लोकांना आपला त्रास होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.

ज्याप्रमाणे पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहेत, त्याप्रमाणे कृषी पर्यटन केंद्र चालकांनीही पर्यटकांची काळजी घेणे आवश्यक आहे. पर्यटकांसाठी मुलभूत सुविधांची उपलब्धता आणि स्वच्छता अधिक महत्त्वाची असते. केंद्र चालकांनी आधुनिक सुविधांपेक्षा नेहमीच्या राहणीमानाप्रमाणेच केंद्राची मांडणी ठेवावी. स्विमिंग पुल बांधण्यापेक्षा विहीर, नदी, पाण्याचे पाठ, त्यांची सुरक्षा याकडे लक्ष द्यावे. गरजेव्यतिरिक्त आधुनिक सुविधा, शहरी खेळ, परदेशी खाद्यपदार्थांचा अवलंब करणे टाळावे. आपल्या केंद्राची नोंद MTDC कडे करणे गरजेचे आहे, त्यामुळे अश्या केंद्रांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल व पर्यटकांना सुरक्षेची हमी मिळेल.

सद्यस्थितीला ५०० हून अधिक कृषी पर्यटन केंद्रे महाराष्ट्रात आहेत, असे कृषी पर्यटन विकास मंडळाने (ATDC) नमूद केले आहे. कृषी पर्यटनाचे दिसणारे सकारात्मक परिणाम महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वाढीसही नक्कीच पूरक ठरतील अशी आशा आहे.

Mahesh Tile

मी महेश टिळे, विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी कर्मधर्मसंयोगाने कला-अध्यापक आहे. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये कलाशिक्षक (Art Teacher), Animator, Programmer, Web-Developer इत्यादी क्षेत्राचा अनुभव घेऊन, आता तंत्रज्ञानासोबत पर्यटन आणि भारतीय संस्कृती या विषयामध्ये मी अभ्यास करीत आहे. अधिक वाचा

4 thoughts on “कृषी पर्यटन – ग्रामीण जीवनशैलीची अनुभूती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.