उद्दीष्टे स्पष्ट असल्याशिवाय कोणत्याही कार्याची अंमलबजावणी नीट होत नाही. हरितसेनेचे प्रमुख उद्दिष्ट हे ५० कोटी वृक्ष लागवड करून राज्याचा ३३% भूभाग वृक्षाच्छादित करणे हे आहे. परंतु असे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याच्या अंमलबजावणीची व लोकं जागरूकतेची अधिक गरज असते. हरीतसेनेने निश्चित केलेली उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

भाग 1 – महावृक्षारोपण (महाराष्ट्र हरितसेना)

  • राष्ट्रीय व राज्य वन धोरणानुसार राज्याचे 33% भौगोलिक क्षेत्र वृक्षाच्छादित करणे.
  • त्याच प्रमाणे भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वातील कलम ४८ अ नुसार वन्यजीव पर्यावरण व इतर नैसर्गिक संसाधनाच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी संबंधित राज्यावर सोपवण्यात आली आहे.
  • प्रत्येक नागरिकास वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याची संधी उपलब्ध करून देणे.
  • लोकसहभागातुन वन, वन्यजीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करणे.

जुलै २०१६ पासून सुरु असलेली ग्रीन आर्मीची संकल्पना उद्दिष्ट पूर्ततेच्या मार्गावर असली, तरी तिची उद्दिष्टे अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेली दिसत नाहीत.

हरितसेना सभासदत्व आणि त्याची प्रक्रिया –

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक याचा सभासद बनू शकतो. तसेच शाळा, सरकारी-खाजगी-स्वयंसेवी संस्था, व्यापारी-उद्योजक, गृहिणी यासर्वांचा यामध्ये सहभाग अपेक्षित आहे. महाराष्ट्र हरित सेनेच्या सदस्यत्वासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येते. नोंदणीसाठी आवश्यक माहिती म्हणजे – नाव, मोबाईल, ईमेल आणि लिंग तसेच एक ओळखपत्र – आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, शालेय/महाविद्यालयीन ओळखपत्र, पारपत्र, शासकीय/निमशासकीय संस्थांनी जारी केलेले ओळखपत्र यापैकी कोणतेही एक दस्तावेज असणे गरजेचे आहे.

हरितसेना महाराष्ट्राच्या सदस्य/स्वयंसेवकाची भूमिका

वन विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात सक्रीय सहभाग असणे अपेक्षित आहे, जसे की- वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी, वनांच्या संरक्षणाकरीता सामुहीक गस्त, वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग, वन्यप्राणी प्रगणनेमध्ये सहभाग, वन विभागामार्फत साजऱ्या केल्या जाणाऱ्या वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागतिक वन दिन इत्यादी उपक्रमांमध्ये सहभाग, वनमहोत्सव कालावधीत वन विभागामार्फत राबविल्या जाणा-या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग, वन्यजीव सप्ताहातील वन्यप्राणी संरक्षणासंबंधीत सर्व उपक्रमांमध्ये सहभाग, पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित प्रभात फेरी, पथनाट्य, सायकल रॅली इत्यादी जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभाग, या व्यतिरिक्त त्यांचे क्षेत्रातील वन, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरणाशी निगडीत कार्यक्रमात/उपक्रमात हिरीरीने सक्रीय सहभाग.

हरीतसेनेत सहभागी /  मोहिमेमुळे जनतेचा होणारा फायदा

  1. जे स्वयंसेवक वर्षभर सक्रिय सहभाग घेतील, त्‍यांची शासनामार्फत विशेष दखल घेऊन त्‍यांना प्रमाणपत्र किंवा पारितोषिक देवून पुरस्‍कृत केले जाईल.
  2. स्वयंसेवक यातून विविध वृक्षारोपण, वनसंवर्धन आणि वन्यजीव संरक्षण या बाबत जागरूक होऊन सामाजिक आणि पर्यावरण बांधिलकी जपत सहभागी व्यवस्थापनात महत्वाची भूमिका पार पाडतील.
  3. यातून मिळणारा अनुभव ते त्यांचे वैयक्तिक व व्यावसायिक लाभाकरिता वापरू शकतील.
  4. स्वयंसेवकांना विविध वन क्षेत्र, अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पात लागणा-या प्रवेश शुल्कात व इतर शुल्कात सवलत देण्याची तरतूद शासनाच्या विचाराधीन आहे.

आजच्या काळात वरील योजना सभासदांसाठी फारश्या प्रेरणादायी वाटत नाहीत. सोशल नेटवर्किंगच्या अधीन असलेल्या समाजाला प्रमाणपत्र किंवा प्रवेश शुल्कातील सवलत ही खास आकर्षित करणारी योजना नाही. वनविभागाने इथे अधिक विचार करून आधुनिक योजना आणि सवलतींचा विचार करणे अपेक्षित आहे. असे असले तरीही. जागरूक आणि जबाबदार नागरिक स्वखर्चाने यामध्ये सहभाग घेऊन हरीतसेनेला उद्दिष्टपूर्तीकडे घेऊन जात आहे. त्यामुळे आपला सर्वांचा सहभाग यामध्ये असणे हे हरित महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक आहे.

विशेष म्हणजे हरीतसेनेचा सभासद होताना एक शपथ घ्यावी लागते,  ती म्हणजे –

वसुंधरा मातेने मला भरभरुन दिले आहे-!
वृक्ष आपला श्वास आणि आपल्या भविष्याचा आधार आहे-!
माझ्या सभोवतालचे पशु, पक्षी आणि झाडे हे रक्ताच्या नात्या-सारखे आहेत-!
त्यांच्या-कडून माझ्या गरजांपुरते मी जरुर घेईन-!
परंतु- अधिक घेण्याचा कदापिही प्रयत्न करणार नाही-!
पाऊस येतो, तो हिरवाईचे स्वप्न घेऊन-!

येत्या ३ वर्षातील पावसाळ्यात ५० कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात मी अंत:करणापासून सहभागी होत आहे-!
राज्य शासनाच्या greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्थ्ळावर हरित सेनेच्या सदस्यत्वाची मी नोंद केली आहे-!
आप्तेष्ट आणि इतरांना या कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रवृत करण्याचा निर्धार करतो/करते-!
फळफळावळ, शोभिवंत आणि सावली देणारी झाडे मोठया संख्येने लावण्याचा मी सातत्याने प्रयत्न करेन-!
वृक्षरोपणानंतर संरक्षण, पाणी पुरवठा, संगोपन आणि देखभाल इत्यादी जबाबदारी घेण्याची मी शपथ घेतो/घेते-!
वन, वन्यजीव, जैवविविधता, सामाजिक वनीकरण, पर्यावरण यांच्याशी संबंधित कार्यक्रमांत भाग घेईल-!
एकंदरीतच वृक्ष क्रांतीची ही मोहीम निरंतरपणे सुरु ठेवण्याचा दृढ संकल्प करतो/करते-!

माझा महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र, जय हिंद !

अधिक वाचा –

Mahesh Tile

मी महेश टिळे, विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी कर्मधर्मसंयोगाने कला-अध्यापक आहे. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये कलाशिक्षक (Art Teacher), Animator, Programmer, Web-Developer इत्यादी क्षेत्राचा अनुभव घेऊन, आता तंत्रज्ञानासोबत पर्यटन आणि भारतीय संस्कृती या विषयामध्ये मी अभ्यास करीत आहे. अधिक वाचा

2 thoughts on “भाग 2 – हरितसेनेची उद्दिष्टे आणि सभासदत्व”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.