जंगले ही जणू पृथ्वीची फुफ्फुसंच आहेत. ज्याप्रमाणे आपले फुफ्फुस नाकावाटे घेतलेल्या श्वासाचे शुद्धीकरण करते, त्याचप्रमाणे ही जंगले मोठ्या प्रमाणात हवेचे शुद्धीकरण करून, हवेतील ऑक्सिजन मध्ये वाढ करीत असतात. प्रत्येक जीवित प्राण्यास या ऑक्सिजनची नितांत गरज असते, त्यामुळे वनसंवर्धन ही आजच्या काळाची मूलभूत गरज बनली आहे. अनेक वन्य जमातीसाठी आणि प्राण्यांसाठी ही जंगलेच घर आहेत. अनेक अद्भुत अश्या प्राणी, पक्षी, झाडं आणि निसर्गरम्य प्रदेशांच माहेरघर म्हणजे जंगल. दहापैकी एकूण नऊ प्रजाती ह्या जंगलात अथवा जंगली वातावरणावर अवलंबून आहेत. वने ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टी ने जेवढी महत्त्वाची आहेत, तेवढीच माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहेत. शुद्ध हवेपासून ते वन उपजांपर्यंत विविधांगांनी वने ही माणसाच्याा दैनंदिन आयुष्याशी जोडली गेली आहेत.

वृक्ष हे मानवासाठी अत्यंत उपयुक्त असूनही मानवाने अनेक वर्षांपासून वृक्षांची अपरिमित तोड केली. यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडले. पर्जन्यमानावर परिणाम झाला. प्रदूषण वाढले. मानवाच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला. अशा संकटांना मानवाने आपल्या अविचाराने दारात आणून सोडले आहे. त्यामुळे वेळीच या जंगलांच महत्त्व ओळखून, या संकटाची तीव्रता कमी व्हावी यासाठी महाराष्ट्र वनविभागाने महावृक्षारोपणाचा प्रकल्प हाती घेतला. अपुऱ्या पडणाऱ्या सरकारी मनुष्यबळाचा विचार करून, त्यामध्ये लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हरीतसेनेची (Green Army) स्थापना केली. येत्या 21 मार्चला आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून हरितसेनेचा आणि वनविभागाच्या वृक्षारोपणाच्या कार्याचा एकूण आढावा व त्याचा गेल्या वर्षभरात पर्या-पर्यटनानिमित्त मी केलेला अभ्यास येत्या काही लेखांद्वारे मांडण्याचा माझा मानस आहे.

भाग 2 – हरितसेनेची उद्दिष्टे आणि सभासदत्व

पर्यावरण, वन, वन्यजीव व इतर नैसर्गिक संसाधंनाच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वातील कलम 48अ नुसार संबंधित राज्यांवर सोपविण्यात आलेली आहे. तसेच राष्ट्रीय वननीती (National Forest Policy) नुसार प्रत्येक राज्याचे एकूण 33% भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, परंतु महाराष्ट्रातील फक्त 20% भूभाग हा वनाच्छादित आहे आणि महाराष्ट्रासाठी ही खरंच खेदाची गोष्ट आहे. निसर्गसंपन्न राज्यामध्ये ही अवस्था नक्कीच चिंताजनक आहे, त्यामुळेच महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षांत एकूण 50 कोटी महावृक्षारोपणाचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून, 1 जुलै 2016 पासून अंमलबजावणी सुरु केली.

50 कोटी (500 million) वृक्षलागवडीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवातीला अनेक नकारघंटेनी आवाज दिला होता. परंतु वनविभागाचे उत्तम नियोजन आणि लोकसहभाग यांची पडताळणी करण्यासाठी, 1 जुलै 2016 या एका दिवसात 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले गेले. महाराष्ट्र वन खाते, सामाजिक वनविभाग, सामान्य लोकं, विद्यार्थी, सरकारी, खाजगी व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून एकूण 2,81,38,634 (2.81 कोटी) वृक्ष लागवड त्या दिवशी केली गेली. फक्त बारा तासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून एक जागतिक विक्रमच प्रस्थापित केला गेला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही त्याची खास दखल घेतली. एकूण 65,674 ठिकाणी 6,14,482 लोकांचा सहभाग नोंदवला गेला. 150 हून अधिक वेगवेगळ्या प्रजातीची रोपटी त्यादिवशी लावली गेली.

प्रचंड लोकसहभाग आणि नियोजनाची अंमलबजावणी यामुळे पुढील तीन (2017 ते 2019) वर्षासाठीअसलेले 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टपूर्ती स्वप्नवत नसून सत्य आहे याची प्रत्येकालाच खात्री झाली. फक्त सरकारी कार्यक्रम न राहता त्याला सार्वजनिक कार्यक्रमाचे स्वरूप येत गेले.

याशिवाय भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वातील कलम 51अ(ग) अन्वये वन, वन्यजीव, नदी, तलाव या सारख्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच प्राणिमात्राबाबत आदर बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपआपल्या परीने सहभाग नोंदवून हरित महाराष्ट्र घडवण्यात हातभार लावावा. पुढील येणारे लेखांद्वारे हरितसेनेच्या उद्दिष्टांचा, कार्याचा, पूर्ततेचा वा एकूण घटकांचा झालेला परिणाम यांचा आढावा घेऊ.

माझा महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र, जय हिंद !

अधिक वाचा –

Mahesh Tile

मी महेश टिळे, विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी कर्मधर्मसंयोगाने कला-अध्यापक आहे. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये कलाशिक्षक (Art Teacher), Animator, Programmer, Web-Developer इत्यादी क्षेत्राचा अनुभव घेऊन, आता तंत्रज्ञानासोबत पर्यटन आणि भारतीय संस्कृती या विषयामध्ये मी अभ्यास करीत आहे. अधिक वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.