गेल्या काही वर्षापासून भारतीय पर्यटन क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे, आणि येत्या काही वर्षामध्ये भारतीय पर्यटन हे जागतिक पर्यटकांच्या यादीत अव्वल स्थानावर असेल. त्यामुळे सध्या भारताचा कल पर्यटन-पूरक विकासाकडे अधिक आहे, शिवाय प्रत्येक राज्ये ही स्वतंत्र पर्यटन विकासासाठी पाऊले उचलताना दिसत आहेत. भारताला लाभलेला सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक संपदा ही भारताची खरी ओळख आहे. शिवाय व्यापार आणि तंत्रज्ञानातील प्रगतीत भारताचा आलेख चढताच आहे आणि त्यामुळे व्यावसायिक पर्यटनामध्ये देखील वाढ होताना दिसून येत आहे. पर्यटन वाढीच्या परिणामांंचा विचार करता आतापासूनच खबरदारी घेणे गरजेचे आहे. पर्यटनाचा देशावर आणि स्थानिकांवर होण्याऱ्या परिणामाला चांगली दिशा देण्याकरिता म्हणून शाश्वत पर्यटन हा पर्याय जगभरातील सर्वच देशांनी अवलंबलेला आहे. त्यामुळे शाश्वत पर्यटन म्हणजे काय हे जाणून घेणे, सर्वच पर्यटकांसाठी आवश्यक आहे.

शाश्वत पर्यटन म्हणजे काय?

शाश्वत पर्यटन (Sustainable Tourism – सस्टेनेबल टुरिझम) म्हणजे पर्यटनाचा कमीत कमी परिणाम पर्यटन स्थळाच्या नैसर्गिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थितीवर झाला पाहिजे. जेणेकरून तेथील जैवविविधतेला हानी पोहोचणार नाही, स्थानिक लोकांच्या जीवनमानावर, नोकरी-व्यवसायावर तसेच सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेऊन पर्यटन करणे म्हणजेच शाश्वत पर्यटन होय.

शाश्वत पर्यटनाची व्याप्ती –

गतवर्षीच्या म्हणजे २७ सप्टेंबर २०१७ च्या जागतिक पर्यटन दिनासाठी शाश्वत पर्यटन जागरूकता होण्यासाठी, पूर्ण वर्षभरासाठी जगभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. भारतानेही त्यात विशेष पुढाकार घेऊन राष्ट्रीय स्थरावर शाश्वत पर्यटनाची ओळख करून देण्याचा पर्यंत केला. तसं भारतासाठी शाश्वत पर्यटन नवीन नाही, भारत दर्शन आणि अतिथी देवो भव या अतुल्य भारतच्या मोहिमेंतर्गत अनेक उपक्रम राबवून जागरूकता केली आहे. तर गेल्या काही वर्षापासून पर्यापर्यटन (eco-tourism) ची मोहीम हाती घेऊन सर्वोत्कृष्ट पर्या-पूरक हॉटेल ( Best Eco friendly Hotel), सर्वोत्कृष्ट जबाबदार पर्यटन प्रकल्प (Best Responsible Tourism Project), सर्वोत्कृष्ट पर्या-पूरक यात्रा संचालकाची पद्धती (Best Eco friendly Practices by Tour Operators) असे अनेक पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर पर्यटन क्षेत्रात दिले जात आहेत.

शाश्वत पर्यटन हा विषय व्यापक आहे त्यामुळे थोड्यात सांगायचे झाले तर, पर्यटकांची पर्यटनस्थळांविषयी असणारी संवेदनशीलता आणि आस्था यांची सांगड व अंमलबजावणी म्हणजेच शाश्वत पर्यटनाचा परीघ होय.

शाश्वत पर्यटन कसे करावे?

आपल्यापैकी बरेच लोक आता पर्यटन करताना काय करावे व काय करू नये याबद्दल जागरूक झाले आहेत. तरीही शाश्वत पर्यटन कसे करावे याविषयी अधिक स्पष्ट ओळख होण्यासाठी खाली काही गोष्टीं नमूद करत आहे.

  • शाश्वत पर्यटन म्हणजे आपल्या प्रवासाचा आणि पर्यटनाचा कमीत कमी परिणाम आपण भेट दिलेल्या स्थळावर झाला पाहिजे. म्हणजे आपण प्रवासासाठी वापरत असलेलं वाहन हे पर्यावरण पूरक असलं पहिले, धूर सोडणारे व बिघाड होणारे वाहन अश्या ठिकाणी नेणे टाळावे.
  • आपण भेट दिलेल्या ठिकाणी, आपण अतिथी तर तेथील स्थानिक हे यजमान आहेत याचे भान ठेवून व्यवहार करणे. यात स्थानिकांशी हुज्जत घालणे, स्थानिकांच्या नोकरी-व्यवसायावर परिणाम होईल असे वर्तन करू नये.
  • आवडीच्या अथवा घरातील सोयी-सुविधाप्रमाणेच सर्व गोष्टी भेट दिलेल्या स्थळी उपलब्ध असतील असे नाही त्यावेळी अश्या सोयी-सुविधांची मागणी करू नये. अश्या मागण्या स्थानिकांसमोर चुकीच्या विकासाची उद्दिष्टे बनून स्थानिक पर्यावरणास हानिकारक ठरतात. उदा. अभयारण्य परिसरात A/C हॉटेल्सची मागणी ही तेथील पर्यावरणास खूप हानिकारक ठरेल.
  • फास्टफूड अथवा डबाबंद खाद्यपदार्थांऐवजी स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा. त्याने तेथील स्थानिक लोकांना रोजगार मिळेल व तेथील खाद्यसंस्कृतीचे संवर्धन होईल.
  • भेट दिलेल्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या, कागद किंवा इतर कचरा कुठेही पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांची योग्य विल्हेवाट लावणे ही आपली जबाबदारी आहे याचे भान ठेवणे.
  • स्थानिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्थानिक कलाकुसरीच्या वस्तूंची खरेदी करावी.
  • आपल्या वर्तनाचे अथवा भाषेचे अनुकरण होऊन, स्थानिक लोकांच्या संभाषणावर किंवा वर्तणुकीवर परिणाम होऊन, तेथील भाषा व सांस्कृतिक वर्तनास इजा पोहोचणार ना याकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्यास स्थानिक भाषा येत नसेल अथवा स्थानिक प्रघात माहित नसतील तर ते स्थानिकांकडून शिकून घेण्याचा प्रयत्न करा व त्याचा वापर करा. उदा. स्थानिक लोकांशी संवाद साधताना त्यांच्याशी त्यांच्याप्रमाणेच शुभेच्छा देणे, बऱ्याच ठिकाणी समोरच्याने दिलेल्या शुभेच्छाचे अनुकरण हीच प्रति-शुभेच्छा असते – जसे महाराष्ट्रात रामराम किंवा शुभ सकाळ या अभिवादनास रामराम किंवा शुभ सकाळ असेच उत्तर दिले जाते.

अश्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचा अवलंब हा शाश्वत पर्यटनासाठी आवश्यक आहे. वर दिलेल्या या यादीवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल त्यामुळे अधिक न सांगणे बरे.

शाश्वत पर्यटनाचा परिणाम

शाश्वत पर्यटनाचा मुख्य व चांगला परिणाम म्हणजे पर्यटनस्थळी असलेला सांस्कृतिक वारसा व नैसर्गिक संपदाचे जतन व संवर्धन होईल. स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने त्यांना रोजगारासाठी इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागणार नाही. स्थानिकांच्या कलाकुसरीच्या वस्तू व कलाप्रकारास संरक्षण मिळेल. स्थानिक खाद्यसंस्कृती, चाली-रिती, प्रघात यांवर अनिष्ट परिणाम होणार नाही.

आपण जरी कमी कालावधीसाठी अश्या पर्यटनस्थळी जात असलो तरी स्थानिकांचा रोज येणाऱ्या नवनवीन पर्यटकांशी संपर्क येत असतो. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या तत्त्वाने स्थानिकांमध्ये, तेथील पर्यावरणात बदल होण्यास सुरुवात होते म्हणून पर्यटकांनी जबाबदारीने शाश्वत पर्यटनाचा अवलंब करावा.

Mahesh Tile

मी महेश टिळे, विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी कर्मधर्मसंयोगाने कला-अध्यापक आहे. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये कलाशिक्षक (Art Teacher), Animator, Programmer, Web-Developer इत्यादी क्षेत्राचा अनुभव घेऊन, आता तंत्रज्ञानासोबत पर्यटन आणि भारतीय संस्कृती या विषयामध्ये मी अभ्यास करीत आहे. अधिक वाचा

4 thoughts on “शाश्वत पर्यटन – व्याप्ती आणि परिणाम”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.