आज २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती.
गतवर्षी शाश्वत पर्यटन हे मुख्य उद्दिष्ट ठेवून पर्यटन दिन साजरा केला गेला. पूर्ण वर्षभर जगभरातील सर्व देशांनी त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, योजना, सुविधा यांचे नियोजन केले. तर या वर्षभरासाठी पर्यटनदिनासाठीचा विषय आहे तो म्हणजे – पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन (Tourism and the Digital Transformation).
डिजिटलदृष्ट्या प्रगत होत जाणाऱ्या पर्यटन क्षेत्रासाठी, प्रत्येकास जागरूक करणे, डिजिटल व तंत्रज्ञानावर आधारित उद्योग-व्यवसायास चालना मिळावी, त्यामध्ये स्थानिकांचा समावेश व त्यांचे सशक्तीकरण करणे, पर्यटनासाठी माहितीचे आधुनिकीकरण करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence चा) वापर करून पर्यटनामध्ये सुलभता आणणे यासारखी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आजचा पर्यटन दिन साजरा केला जात आहे.
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे व मोबाईल आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे आज जगभरातील कोणत्याही ठिकाणची माहिती सहज उपलब्ध होते. तसेच तेथे पोहोचण्यासाठी लागणारी प्रवास योजना व तेथे राहण्याची व्यवस्था ही घरबसल्या कोणाही मध्यस्थीशिवाय इंटरनेटच्या माध्यमातून आज आपण करू शकतो. त्यामध्ये होणाऱ्या प्रगती व फायद्यासोबतच, येणाऱ्या नव-नवीन अडचणी, त्रुटी, दुष्परिणाम, फसवेगिरी यामध्येही भर पडत आहे. त्यामुळे त्यासाठी नवीन नियम-कायदे निर्माण करणे, जागरूकता व माहिती देणे यासारख्या अनेक उपाय-योजना राबवून पर्यटनाच्या सशक्तिकरणासाठी येत्या वर्षभरात जागतिक, राष्ट्रीय व राज्य पातळीवर नक्कीच पाऊले उचलली जातील यात शंका नाही.
डिजिटल पर्यटनाविषयी पुढे एकदा सविस्तर लिहीनच परंतु आता एवढेच सांगेन की, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या प्रवास व पर्यटनासाठी करणे. ज्याप्रमाणे कृषी पर्यटन हे आपल्या शेतकी-संस्कृतीशी नाळ जोडून ठेवण्यासाठी गरजेचे आहे. त्याप्रमाणे जागतिक स्तरावर भारतीय पर्यटनाचा ठसा उमठवण्यासाठी डिजिटल पर्यटनामध्ये प्रगती व आपला सहभाग मोलाची कामगिरी बजावेल.
सर्व पर्यटनप्रेमींना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी महेश टिळे, विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलो तरी कर्मधर्मसंयोगाने कला-अध्यापक आहे. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये कलाशिक्षक (Art Teacher), Animator, Programmer, Web-Developer इत्यादी क्षेत्राचा अनुभव घेऊन, आता तंत्रज्ञानासोबत पर्यटन आणि भारतीय संस्कृती या विषयामध्ये मी अभ्यास करीत आहे. अधिक वाचा